दुबई / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) 2021 महिला विश्वचषक व 2022 पुरुष यू-19 विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीचे सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. कोव्हिड-19 च्या महामारीमुळे हा निर्णय घेणे भाग असल्याचे आयसीसीने येथे नमूद केले. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, महिलांची पात्रता स्पर्धा दि. 3 ते 19 जुलै या कालावधीत श्रीलंकन भूमीत तर पुरुष गटातील यू-19 युरोप पात्रता स्पर्धा दि. 24 ते 30 जुलै या कालावधीत डेन्मार्कमध्ये होणे अपेक्षित होते.
महिलांच्या या पात्रता स्पर्धेत यजमान लंकेसह बांगलादेश, आयर्लंड, हॉलंड, पाकिस्तान, पापूआ न्यू गिनिया, थायलंड, अमेरिका, विंडीज व झिम्बाब्वे आदी 10 संघांचा समावेश आहे. यापैकी 3 संघ मुख्य विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरु शकतात. प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
‘सर्व सदस्य, आरोग्य खात्यातील तज्ञ व प्रशासन खात्यातील पदाधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2021 व आयसीसी यू-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2022 साठी आयोजित पात्रता स्पर्धा लांबणीवर टाकत आहोत’, असे आयसीसीने मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले. आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेबरोबरच डेन्मार्कमध्ये दि. 24 ते 30 जुलै या कालावधीत युरोपियन रिजनल क्वॉलिफायर होणे अपेक्षित होते.
आयसीसी यानंतर सदर स्पर्धांमध्ये सहभागी संघांच्या मंडळांशी चर्चा करुन पुढील तारखांबाबत विचारविनिमय करेल, असे संकेत येथे देण्यात आले. ‘आमच्या दृष्टीने खेळाडूंची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची आहे. खेळाडू, प्रशिक्षक, चाहते व अवघे क्रिकेट वर्तुळ यांची सुरक्षितता, प्रवासावरील बंधने, जागतिक स्तरावरील आरोग्याच्या समस्या व आरोग्य खाते, प्रशासन यांच्या सूचना आदी बाबी नजरेसमोर ठेवत आम्ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला’, असे आयसीसी हेड ऑफ इव्हेंट्स ख्रिस टेटली म्हणाले.
आयसीसी यू-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील आणखी दोन पात्रता स्पर्धा होणे अपेक्षित असून त्याचा फेरआढावा घेतला जाईल, असेही संकेत आहेत. आफ्रिकेतील पात्रता स्पर्धा टान्झानियात दि. 7 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तर आशिया पात्रता स्पर्धा थायलंडमध्ये दि. 1 ते 9 डिसेंबर या कालावधीत होणे अपेक्षित आहे. पाच विभागातील पहिल्या टप्यातील पात्रता फेरीचे सामने 2021 मध्येच पूर्ण करण्याचे आयसीसीचे नियोजन आहे.