ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेत आज (गुरुवार दि. 24) इंग्लंडचा मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होत आहे. या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.30 वाजता प्रारंभ होईल. इंग्लंडचा संघ खराब प्रारंभामुळे दडपणाखाली असून पाकिस्तान व बांगलादेशविरुद्ध शेवटचे दोन्ही सामने जिंकले तरच त्यांना उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करता येणार आहे.
विद्यमान विजेत्या इंग्लंड संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत काही सामने अगदी निसटत्या फरकाने गमवावे लागले आणि याचा त्यांना फटका बसला. मागील दोन सामन्यात मात्र त्यांनी विजय संपादन करत उत्तम पुनरागमन केले. आता तीच घोडदौड उर्वरित दोन्ही लढतीत कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.