ऑनलाईन टीम / पणजी
गोवा विधानसभा २०२२ च्या पार्श्वभूमीवर अनेक नेते गोमंतकियांना नव – नव्या ऑफर देत मतदानकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. तसेच राजकिय कसब पणाला लावत अनेक नेते सत्ता वर्चस्वासाठी घरोघरी भेटी देत आहेत. अनेक नेते बेडुकउड्या मारत गोमंतकियांच्या विकासाला दुय्यम ठरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवन रिव्होल्युशनरीच्या उमेदवारांना अनेक पक्षांकडून ऑफर्स येत आहेत.मात्र ‘आरजी’चे सर्वेसर्वा मनोज परब यांनी आपण गोमंतकियांसाठी असे निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या परिषदेवेळी बोलताना राजेश रेडेकर यांना पणजी मतदारसंघातून व परेश तोरसकर यांना मुरगाव मतदारसंघातून संधी देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच महिलांचे सबलीकरण हे रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख ध्येय आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले.
या महिला सबलिकरणासाठी आरजीकडून महिलांना दरमहा दोन हजार रूपये किंवा व्यवसायासाठी तीन लाख रूपये देण्यात येणार असल्याचे तसेच विधवा महिलांना व्यवसाय करण्यासाठी 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, जेणेकरून त्या स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ सुरळीत भागवू शकतील. अशा प्रकारच्या ऑफर ही मतदारांसमोर ठेवल्या आहेत. ‘लाडली लक्ष्मी’ योजनेद्वारे विवाहासाठी 1 लाख रूपये दिले जातील किंवा 2.5 लाख रूपये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येणार असल्याचे ही यावेळी स्पष्ट केले आहे.