कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा महिला विभागातर्फे स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
येथील कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा महिला विभागाने महिला सुरक्षा आणि पोक्सो कायदा याचे शिक्षिकांसाठी मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम बी. के. मॉडेल येथे पार पडला. सदर कार्यक्रम सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव जिल्हा (द.), बेळगाव जिल्हा कायदा प्राधिकरण आणि अलायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर वरिष्ठ जिल्हा न्यायाधीस विजय देवराज अर्स, शहर गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, वरिष्ठ वकील आणि अलायन्स क्लब इंटरनॅशनलचे चेअरमन दिनकर शेट्टी, कायदेतज्ञ रुपाली पाटील, शिक्षक संघाच्या जिल्हा महिला विभाग प्रमुख डॉ. नवीना शेट्टीगार, बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शैला चाटे, शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा रोहिणी नाईक, आणि जिल्हा सचिव उमेश कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी भरतेश हायस्कूलची दीपिका झांगीड या विद्यार्थिनीने प्रार्थना गायली. पाहुण्यांचे स्वागत शैला चाटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. नवीना शेट्टीगार यांनी केला. प्रास्ताविकात रोहिणी नाईक यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबरोबर माध्यमिक शिक्षक संघाचा आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक संघाच्या कार्याचा आढावा घेतला. उद्घाटक म्हणून लाभलेले बेळगाव जिल्हा वरिष्ठ न्यायाधीश विजय देवराज अर्स यांनी, शिक्षकांनी मला मुळाक्षरे शिकविली, मला ज्ञान दिले. त्यामुळेच मी आज न्यायाधीश होऊ शकलो. माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान मी शिक्षकांना देतो. आज मला धन्यता वाटते की आपल्यासमोर बोलण्याचं धाडस मला प्राप्त झाले. शिक्षकांनी मनात आणले तर सारा समाज एक प्रगतीपथावर आणि योग्य मार्गाने जाईल, यात शंका नाही. कायदा हा समाज व्यवस्था सुरळीत चालविण्यासाठी असतो. त्याचे पालन सर्वांनी करावे, असे प्रतिपादन केले.
वरिष्ठ वकील दिनकर शेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना एकनाथ पाटील यांनी आई जिजाऊंचा वारसा पुढे चालावा. आपल्या मुलांची जशी काळजी घेतो तशी शाळेतील मुलांचीही काळजी घेतल्यास सामजिक असुरक्षितता कमी होईल. माध्यमिक शिक्षक संघ या कार्यात पाठीशी राहील. एकसंघ होण्यासाठी शिक्षक संघालाही सहकार्य करा, अशी एकजुटीची हाक दिली. सूत्रसंचालन जिल्हा सचिव सरस्वती देसाई यांनी केले तर सिंधू पाटील यांनी आभार मानले.
शिक्षिकांनी कायदा समजावून घ्या
गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी स्त्री ही जगतजननी, आदिशक्ती, जगउद्धारीनी असून नवजीवाची उत्पती आणि त्याच्यावर संस्कार हे आईचे असतात त्यामुळे शिक्षिका म्हणून ते संस्कार शाळेत विकसित करा, असे आवाहन केले. कायदे तज्ञ रुपाली पाटील यांनी महिला सुरक्षा, बाल सुरक्षा आणि पाक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षिकांनी प्रथम कायदा समजावून घ्यावा त्यानंतर तो शाळेत विद्यार्थिनींना त्यानंतर सामाजिक स्तरावर महिलांमध्ये कायद्याबद्दल जागृती करावी. त्यामुळे शोषण, अत्याचार आणि हुंडाबळीसारख्या घटना कमी होतील, असे त्या म्हणाल्या.