वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील महिला हॉकी या क्रीडा प्रकारात अर्जेंटिनाने जर्मनीचा पराभव करत 2012 नंतर पहिल्यांदाच उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. उपांत्यफेरीत अर्जेंटिनाची गाठ ऑस्ट्रेलिया किंवा भारत यांच्याबरोबर बुधवारी पडणार आहे.
2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया जर्मनीच्या महिला हॉकी संघाला सोमवारच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने जर्मनीचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला. अर्जेंटिनाने आतापर्यंत ऑलिम्पिक महिला हॉकीमध्ये एकदाही सुवर्णपदक मिळविलेले नाही. पण 2012 च्या लंडन ऑलिम्पिक तसेच 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदके मिळविली होती.
या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मध्यंतराला केवळ काही मिनिटे बाकी असताना मोसीयाच्या पासवर ऑगिस्टीना अल्बर्टेरोने अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर पेनल्टी कॉर्नरवर मारिया व्हिक्टोरिया ग्रेनेटोने अर्जेंटिनाचा दुसरा गोल नोंदविला. 52 व्या मिनिटाला व्हॅलेंटिना रुईजने अर्जेंटिनाचा तिसरा आणि शेवटचा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवून जर्मनीचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात जर्मनी संघाकडून गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. त्यांना पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आला नाही.