ऍमस्टेलव्हिन (हॉलंड)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू झालेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी ब गटात भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना खेळविला जाणार आहे. भारतीय महिला हॉकी संघ या सामन्यात आपल्या मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे.
गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या हॉकी या क्रीडाप्रकारात कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केल्याने भारतीय महिला हॉकी संघाला या स्पर्धेत पहिले पदक मिळविण्यापासून वंचित व्हावे लागले होते. या मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ प्रयत्नाची शिकस्त करेल.
महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत भारतीय महिला हॉकी संघाने 1974 साली झालेल्या पहिल्या स्पर्धेत चौथे स्थान मिळविले होते. त्याचप्रमाणे टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चौथे स्थान पटकाविले होते. भारतीय संघातील गोलरक्षक आणि अनुभवी कर्णधार सविता पुनिया हिला बिचुदेवी, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का, गुरूजित सिंग, उदिता, निक्की प्रधान, सुशिला चानू, नेहा गोयल, नवजोत कौर, सोनिका, ज्योती, निशा, सलीमा टेटे आणि मोनिका यांची साथ लाभेल. 2018 साली झालेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय महिला हॉकी संघाचे 5 जुलै रोजी चीनविरुद्ध तर 7 जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध गटातील सामने होणार आहेत.