डाँघेई, द.कोरिया : भारतीय महिला हॉकी संघातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी महिला हॉकी स्पर्धेतील दक्षिण कोरियाविरुद्धचा बुधवारचा सामना रद्द करण्यात आला.
यजमान संघ या स्पर्धेचा विद्यमान विजेताही आहे. हॉकी इंडियाच्या सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला असून आशियाई हॉकी फेडरेशननेही या संदर्भात निवेदन दिले आहे. मात्र कोरोनाबाधित खेळाडूचा कोणताही तपशील त्यांनी दिलेला नाही. ‘मंगळवारी घेण्यात आलेल्या रूटिन चाचणीत भारतीय संघातील एक सदस्य पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, हे आम्हाला खेदाने सांगावे लागत आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी 3 वाजता होणारा भारत-दक्षिण कोरिया सामना रद्द करण्यात आला आहे. या संदर्भातील पुढील माहिती लवकरच देण्यात येईल,’ असे एएचएफने ट्विटद्वारे सांगितले.