शाहुवाडी / प्रतिनिधी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथील कोकरूडला निघालेल्या श्रीमती मंगल ज्ञानदेव कुंभार या महिलेला गाडीत बसण्यासाठी जागा देऊन अमेणी गावच्या हद्दीत तिच्या अंगावरील ४७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. याबाबत अनोळखी स्त्री व पुरुष यांच्या विरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती मंगल ज्ञानदेव कुंभार या कोकरुडकडे जात असताना त्यांना त्या मार्गावर निघालेल्या चार चाकी गाडीत बसण्यासाठी जागा दिली. गाडी हॉटेल वनश्रीच्या पाठीमागे अमेणी गावच्या हद्दीत गेल्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या गळयातील बोरमाळ, कानातील झुबे, अंगठी व साधा मोबाईल असा सत्तेचाळीस हजारांचा मुद्दे माल चोरून घेतले. याबाबत श्रीमती मंगल ज्ञानदेव कुंभार यांनी शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पांढरे हे करत आहेत.