कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकन क्रिकेटने माजी कर्णधार महेला जयवर्धनेला राष्ट्रीय संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. दि. 1 जानेवारी 2022 पासून ही निवड अंमलात येईल, असे लंकन मंडळाने म्हटले.
‘महेला जयवर्धने नव्या पदावर एक वर्षासाठी विराजमान असेल. तो राष्ट्रीय संघाला मार्गदर्शनाची धुरा सांभाळेल. त्याचा अनुभव संघासाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे. महेला संघाशी करारबद्ध होतो आहे, याचा आम्हाला आनंद आहे’, असे लंकन क्रिकेट मंडळाचे सीईओ ऍश्ले डीसिल्वा यांनी पत्रकातून नमूद केले.
‘अगदी अलीकडेच आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात महेला यांचे योगदान लक्षवेधी ठरले होते’, असेही ऍश्ले येथे म्हणाले. जयवर्धने आता राष्ट्रीय संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी नियुक्त झाला असला तरी यानंतरही 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा त्याच्याकडेच कायम असेल, असे लंकन मंडळाने स्पष्ट केले. सध्या 19 वर्षाखालील संघ विंडीजमध्ये होणाऱया युवा विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत आहे.