वार्ताहर / सौंदलगा
येथील राष्ट्रीय महामार्गावरील मांगूर फाटय़ावर कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. संभाजी अप्पू चव्हाण (रा. शिवापूरवाडी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, संभाजी हे शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास निपाणीहून आपली दुचाकी (केए 23 ईसी 2818) ने शिवापूरवाडीला जात होते. यावेळी मांगूर फाटय़ावर रस्ता ओलांडताना पाठीमागून येणाऱया कार (क्र. एमएच 09 एफबी 8671) ची दुचाकीस जोराची धडक बसली. त्यामुळे संभाजी हे दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळले. कारदेखील महामार्गानजीकच्या झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे कारचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कारमधील एअरबॅग्ज वेळेत उघडल्याने कार चालकाचे प्राण वाचले. सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून जखमीला 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी निपाणीला हालविण्यात आले.