वास्को :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरूवारी वास्कोतील मांगोरहिल वस्तीला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सद्यस्थितीत वास्कोतील परिस्थिती नियंत्रणात असून कंटेनमेंट झोन पुरताच कोरोना मर्यादीत आहे. हा संसर्ग सामूहिक संसर्ग नाही, तो स्थानिक संसर्ग आहे. तरीही तशीच परिस्थिती उद्भवल्यास वास्कोत लॉकडाऊन किंवा काही निर्बंध लादण्याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन योग्य विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री थेट मांगोरहिल वस्तीत दाखल झाले. त्यांनी तेथे उपस्थित शासकीय अधिकाऱयांशी चर्चा केली. कामाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मुरगाव पालिका सभागृहात बैठक घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर, मुरगावचे अनेक नगरसेवक तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, पोलीस अधीक्षक अरविंद गावस, मुरगावचे मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मांगोरहिलच्या सद्यस्थितीबाबत, खबरदारीविषयी उपयुक्त सूचना केल्या. मांगोरहिल भागातील कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असला तरी हा संसर्ग वास्कोतील इतर भागांमध्ये पोहोचलेला नाही. या वस्तीतील लोकांशी ज्या बाहेरील लोकांचा संपर्क आला होता अशा 75 लोकांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. वास्कोतील संसर्ग सामूहिक संसर्ग नाही. तो स्थानिक संसर्ग आहे. हा संसर्ग कंटेनमेंट झोन पुरताच मर्यादीत आहे. शासकीय पथकाने या झोनवर पूर्ण नियंत्रण ठेवलेले आहे. जनतेने कोरोनामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय
स्थानिक आमदार व नगरसेवकांनी केलेल्या लॉकडाऊनच्या मागणीची दखल घेण्यात आलेली आहे. मात्र, सद्यस्थितीत तशी आवश्यकता नाही. गरज भासल्यास वास्को लॉकडाऊन करणे किंवा स्थानिक व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध आणण्याबाबत विचार करण्यात येईल. त्यासाठी तालुक्यातील चारही आमदारांना विश्वासात घेतले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नगरसेवकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडून उत्तरे
नगराध्यक्ष नंदादीप राऊत तसेच उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर व नगरसेवक यतीन कामुर्लेकर, दीपक नाईक, फेड्रीक हेन्रीक्स, क्रितेश गावकर, मुरारी बांदेकर, लाविना डिसोजा, पास्कॉल डिसोजा, लियो रॉड्रिक्स, राजन फळदेसाई, शशिकांत परब यांनी सद्यस्थितीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समर्पक उत्तर दिली व उपस्थित अधिकाऱयांना उपयुक्त सूचना केल्या.
नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांनी कंटेनमेंट झोनमधील लोकांना रेशन व जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची तक्रार मांडताच संध्याकाळपर्यंत सर्व गरजू लोकांना आवश्यक वस्तू पुरवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना केली. मांगोरहिलच्या वस्तीत एकूण 350 कुटुंबे असल्याचे स्पष्ट करून प्रत्येक कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्यांचे फोन क्रमांक मिळवण्याचे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. काही नगरसेवकांनी प्रसाराबाबत भिती व्यक्त केली असता एखादा संशयित संपर्कात आल्याचे वाटत असल्यास किंवा शंका असल्यास किंवा आपली तब्बेत बिघडत असल्याचे संकेत मिळत असल्यास कोविड चाचणी करून घ्यावी. काही दिवसांसाठी इतरांपासून दूर राहा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. नगरसेविका लाविना डिसोजा यांनी मच्छीमार जेटी परिसरात काही लोक काम करतात त्यांचीही तपासणी होण्याची आवश्यकता व्यक्त केली. आडवाटेने काही लोक कंटेन्मेट झोनमधून बाहेर पडत असल्याच्या तक्रारी मांडताच अशा प्रकाराबाबत लगेच पोलिसांना कल्पना द्यावी. कंटेन्मेंट कायदय़ानुसार त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्री म्हणाले.
नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनीही यावेळी खबरदारी व उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्कोतील स्थितीची दखल घेऊन भेट दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच वास्कोतील संसर्ग अधिक वाढल्यास लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनीही सद्यस्थितीबाबत उपस्थितांना माहिती दिली. नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.