कॅनडाच्या संशोधकांचा दावा : विषाणूंची संख्या वाढविणाऱया प्रोटीनला करते ब्लॉक : उपचारपद्धतीत होणार सुधारणा
मांजरांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर दिले जाणारे औषध (जीसी373 आणि जीसी376) माणसांनाही लाभदायक ठरू शकते असा दावा कॅनडाच्या अल्बर्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांनुसार हे औषध संक्रमणानंतर शरीरात कोरोनाची संख्या (रेप्लिकेशन) वाढविण्यापासून रोखते. असे घडल्यास संक्रमण थांबते.
शरीरात कोरोना विषाणूला स्वतःची संख्या वाढविण्यासाठी प्रोटीनची गरज भासते. परंतु याच प्रोटीनला तोडणारे औषध आम्ही शोधून काढले आहे. संसर्गानंतर कोरोनाचा विषाणूला मानवी शरीरात रेप्लिकेट करता येऊ नये यासाठी हे औषध उपयुक्त असल्याची माहिती अल्बर्टा विद्यापीठातील जैवरसायन विभागाच्या प्राध्यापिका जॉनी लिमेक्स यांनी दिली आहे.
मांजरांसाठी निर्मिती
हे औषध मांजरांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आले होते. 2003 साली सार्स महामारी फैलावल्यावर हे औषध माणसांवर किती प्रभावी आहे हे पाहण्यासाठी संशोधन करण्यात आले होते, असे लिमेक्स यांनी सांगितले आहे.
प्रयोगशाळेत दिसून आला प्रभाव
कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने या औषधावर संशोधन करून ते विषाणूला रोखण्यास मदत करते की नाही हे शोधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता एका टेस्ट टय़ूबमध्ये मानवी पेशी आणि कोरोनाला सामील करण्यात आल्यावर औषधाचा प्रभाव पाहण्यात आला. हा प्रभाव सकारात्मक होता असे लिमेक्स यांच्याकडून सांगण्यात आले.
मानवी परीक्षणाची तयारी
कोरोनाबाधितांवर या औषधाच्या मदतीने उपचार केल्यास तो प्रभावी ठरणार आहे. याच कारणामुळे औषधाची क्लीनिकल ट्रायल सुरू करण्यासाठी अनुमती घेतली जाणार आहे. याचबरोबर हे औषध वेगवेगळय़ा प्रकारे वापरण्याचीही तयारी सुरू असल्याचे लिमेक्स म्हणाल्या.
मांजरांनाही लागण
21 एप्रिल रोजी न्यूयॉर्कच्या दोन पाळीव मांजरांना कोरोनाची लागण झाली होती. मांजरांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार मांजरांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना घरातील किंवा शेजारच्या लोकांमुळे संसर्ग झाल्याचे मानले जात आहे. न्यूयॉर्क सिटीच्या ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील 4 वर्षीय वाघिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
मांजरांपासून अन्य प्राण्यांना धोका
चिनी संशोधकांनी यापूर्वीच पाळीव मांजरांच्या मालकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. एक मांजर संक्रमित झाल्यास अन्य प्राणी म्हणजेच श्वान, कोंबडी, डुक्कर, बदक यांच्यात संसर्ग फैलावण्याचा धोका अधिक असल्याचे चीनच्या हरबिन वेटरनरी रिसर्च इन्स्टीटय़ूटच्या संशोधकांनी म्हटले आहे. बेल्जियममध्ये एका मांजराला कोरोनाचा संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास, उलटय़ा आणि अतिसाराची लक्षणे दिसून आली होती.
जपानची भारताला भरीव मदत
जपानने कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी भारताकरता आपत्कालीन कर्ज वाढविले आहे. भारतासाठी 50 अब्ज येन (सुमारे 34 अब्ज रुपये)ने आपत्कालीन कर्ज वाढविल्याचे जपानकडून सांगण्यात आले आहे. या कर्जावर वार्षिक 0.01 टक्के व्याज आकारले जाणार असून त्याची मुदत 15 वर्षांची असणार आहे.
अमेरिकेत होणार चाचणी
एस्ट्राजेनेकाची लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केली आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीत अमेरिकेत 80 ठिकाणी सुमारे 30 हजार स्वयंसेवकांना सामील करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अमेरिकेत मॉडर्ना आणि फायजर या कंपनीच्या लसी देखील तिसऱया टप्प्यातील चाचणीला सामोऱया जात आहेत. दोन्ही कंपन्या 30 हजार स्वयंसेवकांवर परीक्षण करत आहेत.
भूतान : टाळेबंदी शिथिल
भूतान सरकारने टाळेबंदी शिथिल करण्यास प्रारंभ केला आहे. तेथे 11 ऑगस्ट रोजी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदी कालबद्ध पद्धतीने शिथिल करण्यात येणार आहे. दर 10 दिवसांनी शिथिलता वाढविली जाईल अशी माहिती पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी दिली आहे. देशात 225 बाधित सापडले आहेत.
एस्ट्राजेनेकाची लस आता चाचणीच्या तिसऱया टप्प्यात
जगभरात कोरोनाची लागण आतापर्यंत 2,56,62,091 जणांना झाली आहे. यातील 1,79,62,425 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8,55,352 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. तर सद्यकाळात 68 लाख 45 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत एस्ट्राजेनेकाची लस तिसऱया टप्प्यातील चाचणीत पोहोचल्याची माहिती दिली आहे. लवकरच तिसऱया टप्प्यातील अन्य लसींसोबत तिलाही अनुमती मिळणार आहे. अशक्य मानले जाणारे काम आम्ही करत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इस्रायल : 2,576 नवे रुग्ण
इस्रायलमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 2,576 नवे रुग्ण सापडले असून 20 जणांना जीव गमवावा लागला आहे. महामारीमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये देशात 3.9 टक्के असणारा बेरोजगारी दर आता वाढून 20.7 टक्के झाले आहे. या स्थितीमुळे लोक नेतान्याहू सरकारवर नाराज आहेत.
ब्राझील : 1.21 लाख बळी
ब्राझीलमध्ये कोरोना महामारीमुळे 1 लाख 21 हजार 515 जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील 24 तासांमध्ये तेथे 553 बळी गेले आहेत. सलग पाचव्या दिवशी हजारपेक्षा कमी जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 45 हजार 961 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 39,10,901 बाधित आढळून आले आहेत.
खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक
कोरोनावरील लसीला आपत्कालीन मंजुरी देण्यात अत्यंत खबरदारी आणि गांभीर्य बाळगण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लसीला मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याचा विचार सुरू असल्याची घोषणा अमेरिकेने केल्याने डब्ल्यूएचओs हे विधान महत्त्वाचे मानले जातेय.