एकमेकांना निमंत्रण नाही मात्र नेतेमंडळी एकच
प्रतिनिधी/ पणजी
भाजप उमेदवारी प्रश्नावरुन बहुचर्चेत आलेल्या मांद्रे मतदारसंघात दोन तासांच्या फरकाने भाजपचे दोन कार्यक्रम दोन्ही उमेदवारांकडून होणार असल्याने हा विषय आता खमंगपणे चर्चिला जात आहे.
प्राप्ती माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राजकारणातील आपले मित्र व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तसेच पेडणेचे माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांचा जाहीर सत्कार उद्या सोमवार दि. 22 रोजी सायं. 4.30 वा. विद्या संकूल हरमल येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे ठेवला असून या संस्थेचे चेअरमन स्वतः लक्ष्मीकांत पार्सेकर हे आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील व त्यांच्याच हस्ते सत्कार करण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे खास उपस्थित राहाणार असून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व यावेळी प्रो. दत्ता भि. नाईक हे विशेष व्याख्यान देतील.
सोपटे यांच्यातर्फे भाजप कार्यकर्ता मेळावा
दरम्यान, या कार्यक्रमाच्या दोन तास अगोदर मांद्रेचे भाजप आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झेडपी सभागृहात ठेवला आहे. यातील गमतीचा भाग म्हणजे या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, देवेंद्र फडणवीस, श्रीपाद नाईक व सदानंद तानावडे हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही कार्यक्रम भाजपचेच व दोन्ही ठिकाणी एकच नेते, केवळ आयोजन वेगवेगळे. दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही एकमेकांना निमंत्रण दिलेली नाहीत. दोन्ही दिव्यांमध्ये तेल टाकण्यासाठी नेते मंडळी जाणार आहेत. या प्रकारावरुन दोन्ही ठिकाणी जाणाऱया नेत्यांनी दोन्ही उमेदवारांना एकमेकांशी स्पर्धा करुन भाजपमध्ये भिंती उभ्या करु नका, असाही सल्ला दिलेला नाही. या प्रकारामुळे सध्या गोव्यात खमंगपणे राजकीय चर्चा रंगलीय.