वार्ताहर/ किणये
हलगी, रण वाद्यांच्या गजरात व असंख्य शेकडो कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत महान भारत व जय महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे याने हरियाणा येथील मनजीत सिंगला 15 व्या मिनिटाला घिस्सा डावावर चीतपट करून सावगावचे मैदान जिंकले.
खास होळी सणानिमित्त कै. परशराम पैलवान यांच्या स्मरणार्थ सावगाव येथील जय हनुमान कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी भव्य कुस्ती आखाडय़ाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे विरूद्ध मनजीत सिंग यांच्यात सतीश पाटील, पप्पू होनगेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदींच्या हस्ते लावण्यात आली.
दोन्ही पैलवानांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत कुस्तीला प्रारंभ केला. पुढे कुस्ती रंगतदार होऊ लागली. यावेळी कुस्तीप्रेमींनी टाळय़ा वाजवून दोन्ही पैलवानांना प्रोत्साहन दिले. अखेर माऊली जमदाडेने मनजीत सिंगला घिस्सा डावावर चीतपट केले. या कुस्तीला पंच म्हणून रत्नकुमार मठपती यांनी काम पाहिले.
हरियाणा येथील वीरेंद्रकुमार विरूद्ध सोलापूर येथील सिकंदर शेख यांच्यात दुसऱया क्रमांकाची लढत झाली. ही कुस्ती मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱया क्रमांकाची कुस्ती चटकदार ठरली. अवघ्या सातव्या मिनिटावर आकडी डाव करून सिकंदर शेखने वीरेंद्रकुमारला चीतपट केले. पंच म्हणून कृष्णा पाटील यांनी काम पाहिले.
सोलापूर येथील प्रकाश बनकर विरूद्ध कार्तिक काटे राणेबेन्नूर यांच्यात तिसऱया क्रमाकांची कुस्ती झाली. ही कुस्ती सुमारे 25 मिनिटे रंगली. त्यानंतर घिस्सा डावावर कार्तिक काटे याने प्रकाश बनकर याला चीतपट केले. पंच म्हणून काशीराम पैलवान हे होते.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील (शाहू अखाडा) विरूद्ध संगमेश बिराजदार यांच्यात झाली. या कुस्तीत संगमेश बिराजदार यांनी विजय पाप्त केला. पंच महणून दामाजी मोरे यांनी काम पहिले.
आखाडय़ाचे पूजन निंगाप्पा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान फोटो पूजन आणि आखाडय़ाचे उद्घाटन मृणाल हेब्बाळकर, पप्पू होनगेकर, तुषार गडकरी, मारूती काकतकर, अनिल हेगडे आदींच्या हस्ते करण्यात आले. आखाडय़ातील पंच म्हणून शंकर पाटील, बाबू कणबरकर, परशराम शहापूरकर, कृष्णा शहापूरकर, शट्टू पाटील, परशराम कांगणकर यांनी काम पाहिले.
आखाडय़ात सुमारे 45 हून अधिक निकाली कुस्त्या झाल्या. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष यशवंत बाणेकर, शंकर पाटील, लक्ष्मण पाटील, सिद्राय पाटील, सुधाकर कदम, आप्पाजी पाटील आदींसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.