मजेत पार करू शकणार महामार्ग
ब्राझीलमध्ये माकडांसाठी सरकारने अशा ब्रिजची निर्मिती केली आहे, ज्याच्या मदतीने ते सहजपणे रस्ता ओलांडू शकतील. या ब्रिजची निर्मिती रियो डी जेनेरियोच्या एका भागात करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनक्षेत्र असल्याने वन्यप्राणी अनेकदा रस्ता ओलांडताना दुर्घटनेचे शिकार ठरत होते.
ब्राझीलचा हा अटलांटिक फॉरेस्ट एरिया असून तेथे अनेक प्रकारचे वन्यप्राणी राहतात. पण जंगलामधून महामार्ग जात असल्याने वन्यप्राणी अनेकदा रस्ता ओलंडताना स्वतःचा जीव गमावत होते किंवा जखमी व्हायचे. तसेच यामुळे प्रवाशांनाही समस्या होत होती. प्रवासी देखील दुर्घटनांना बळी पडायचे.
हा ब्रिज गोल्डन लायन टॅमरिन प्रजातीच्या माकडांसाठी तयार करण्यात आला आहे, कारण महामार्ग ओलांडण्याचे प्रकार या प्रजातीच्या माकडांकडूनच अधिक प्रमाणात होत असतात. या ब्रिजच्या निर्मितीमुळे माकडांसह अनेक अन्य प्राण्यांनाही लाभ होणार आहे. ते सहजपणे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱया बाजूला जाऊ शकतील.
2018 मध्ये येलो फीव्हरमध्ये येथील गोल्डन लायन टॅमरिन प्रजातीच्या 32 टक्के माकडांचा मृत्यू झाला होता. आता तेथे केवळ 2,500 माकडंच शिल्लक राहिली असल्याने त्यांच्यासाठी या विशेष ब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे. हा निर्णय वन्यजीव तज्ञांच्या सल्ल्यानंतर घेण्यात आला आहे. गोल्डन लायन टॅमरिन प्रजातीच्या माकडांची संख्या अशाचप्रकारे कमी होत गेल्यास ही प्रजाती लुप्त होण्याचा धोका आहे. याचमुळे त्यांना वाचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे उद्गार मेटापॉप्युलेशन प्रोजेक्टचे कार्यकारी संचालक लुइस पावलो मार्क्स फेराज यांनी काढले आहेत. 2,500 गोल्डन लायन टॅमरिन माकडांसाठी सुमारे 25,000 हेक्टर्स जंगलाची आवश्यकता भासते. सध्या असलेले जंगल त्यांच्यासाठी पुरेसे नाही. कारण रस्ते आणि इमारतींच्या निर्मितीसाठी जंगलाच्या जमिनींचा वापर करण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले.