थकीत मानधनासह सुविधा देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेंगळूर
आर्थिक संकट असतानाच मागील दोन महिन्यांचे मानधन, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझरचा पुरवठा तसेच कोरोनाची लागण झालेल्या आशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी सोमवारी राज्यातील आशा कार्यकर्त्यांनी ऑनलाईन आंदोलन केले. घरातून आणि कामाच्या ठिकाणाहून आशा कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
आशा कार्यकर्त्या संघटनेचे अध्यक्ष के. सोमशेखर यादगीरमधून तर संघटनेच्या सचिव डी. नागलक्ष्मी यांनी बळ्ळारीतून, उपाध्यक्षा रमा टी. सी. बेंगळूरमधून आणि खजिनदार संध्या पी. एस म्हैसूरमधून आंदोलनात सहभागी झाले. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग व्यापक प्रमाणात पसरत आहे. प्रत्येक घरामध्ये सर्दी, खोकला, ताप आदी आजार दिसून येत असताना जनतेचा आत्मविश्वास वाढविण्याचे, जनतेमध्ये सुरक्षेविषयी जागृती करण्याचे काम आशा कार्यकर्त्या करीत आहेत. त्या घरोघरी जाऊन कोविड औषधांच्या किटचे वाटप, कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्यांना चाचणीसाठी पाठवून देणे, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे आदी कामांची जबाबदारी आशा कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली आहे.