खासगी शिक्षण संस्था, शैक्षणिक संघटना पदाधिकाऱयांच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी शिक्षण संस्था, शैक्षणिक संघटना पदाधिकारी व कर्मचाऱयांची संयुक्त बैठक शनिवारी कॉलेज रोड येथील जी. ए. पदवीपूर्व महाविद्यालयात झाली. यावेळी शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचाऱयांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. खासगी शिक्षण संस्था, शिक्षक आणि कर्मचाऱयांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर मागण्या तातडीने मान्य न झाल्यास दि. 16 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
शाळा इमारतीच्या मान्यतेचे नूतनीकरण करण्यासाठी अग्निशमन दलाची परवानगी तर इमारत सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र या दोन्ही खात्यांकडून अवाढव्य शुल्क आकारले जात आहे. याबरोबरच 2015 पासून शिक्षक भरती झाली नाही. शासनाकडून त्यासाठी परवानगीदेखील दिली जात नाही. तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱयांचीदेखील भरती करण्यात आली नाही. त्यामुळे इतर शिक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमावरदेखील परिणाम होत आहे. यासह इतर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष रामू गुगवाड, कार्याध्यक्ष एस. एस. मठद, एम. ए. कुरीशेट्टी, अशोक अनिगेरी, एम. एस. तल्लूर, बी. आर. हिरेमठ, एम. बी. होलमनी, विजय आरगावी आदी उपस्थित होते.