ऑल इंडिया सफाई मजदूर संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेत हंगामी तत्त्वावर स्वच्छतेचे काम करणाऱया मागासवर्गीय कामगारांना सेवेत कायमस्वरुपी करावे, तसेच आनंदवाडी येथील मोडकळीस आलेल्या पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारतीची नव्याने उभारणी करावी, अशा मागण्यांसह विविध समस्यांचे निवारण करण्याचे निवेदन ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. शिवाण्णा यांना देण्यात आले.
महापालिकेत 1982 पासून भरती करण्यात आली नाही. तेव्हापासून असंख्य स्वच्छता कामगार हंगामी तत्त्वावर स्वच्छतेचे कामकाज करीत आहेत. सदर कामगारांना निवृत्तीवेतन, ग्रॅज्युईटी असा लाभ मिळत नाही. त्यामुळे 1980 पासून महापालिकेत हंगामी तत्त्वावर काम करणाऱया मागासवर्गीय स्वच्छता कामगारांना सेवेत कायमस्वरुपी करण्यात यावे, तसेच त्यांना विविध लाभ देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सेवेत कायमस्वरुपी करताना निवृत्त स्वच्छता कामगारांच्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्यात यावे.
स्वच्छता कामगार राहत असलेली घरे स्वच्छता कामगारांच्या नावे कायमस्वरुपी करून देण्यात यावीत, आनंदवाडी शहापूर येथील पी.के. क्वॉर्टर्सची गॅलरी कोसळल्याने दोघेजण जखमी झाले होते. त्यांना नुकसानभरपाई देण्यासह पी. के. क्वॉर्टर्सच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, तसेच पी. के. क्वॉर्टर्समधील कामगारांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. स्वच्छता कामगारांच्या क्वॉर्टर्सची अवस्था खूपच खराब झाली असून छत कोसळणे, पावसाळय़ात गळती लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या सर्व पी.के. क्वॉर्टर्सची दुरुस्ती करावी.
स्वच्छता कामगारांचे निवृत्तीवेतन पहिल्या तारखेला जमा करावे, अशा विविध मागण्या ऑल इंडिया सफाई मजदूर संघाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. शिवाण्णा यांची भेट घेऊन संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष काशिराम चक्हाण, जिल्हाध्यक्ष मुरली चव्हाण, जिल्हा सचिव विवेक घटकांबळे आदींसह सुभाष चव्हाण, संजय भंडारे, निरज बनसकर आदी उपस्थित होते.