ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शनिवारी हा आकडा 85 हजारच्या वर जाऊन पोहचला आहे. त्यातच आता दिल्लीतून एक धक्कादायक बातमी येत आहे. मागील चोवीस तासात सुरक्षा बल च्या (बीएसएफ) 16 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 200 पेक्षा अधिक जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी जोधपूर मधील 42, त्रिपुरा मधील 31 आणि दिल्लीतील 25 अशा एकूण 98 कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत बीएसएफच्या एकूण 135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीत आता पर्यंत 9 हजार 333 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 5 हजार 278 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे.