दर 10 हजारांपैकी 711 बेरोजगार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील वर्षी देशात कोविडमुळे बेरोजगारी दर तीन दशकातील 7.11 टक्क्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. याचाच अर्थ 2020 मध्ये काम करण्यायोग्य दर 10 हजार जणांपैकी 711 जणांना काम मिळू शकलेले नाही. भारतात मागील वर्षी बेरोजगारी दराविषयी ही माहिती इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनने (आयएलओ) स्वतःच्या आयएलओ स्टॅट डाटाबेसच्या दाखल्याने दिली आहे.
मागील एक दशकात भारतातील बेरोजगारी शेजारी देशांपेक्षा अधिक राहिली आहे. पण एक दशकापूर्वी 2009 मध्ये रोजगाराप्रकरणी श्रीलंकेतील स्थिती अधिक वाईट होती.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीनुसार चालू वर्षात जानेवारीमध्ये 6.62 टक्के राहिलेला मासिक बेरोजगारी दर एप्रिलमध्ये वाढून 7.97 टक्क्यांवर पोहोचला आहे. लॉकडाउनमुळे लोकांची ये-जा आणि मालवाहतुकीत अडथळे आले आहेत. याचमुळे 16 मे 2021 रोजी संपलेल्या आठवडय़ात दर 10 हजार कामगारांवर बेरोजगारांच संख्या 1450 वर पोहोचली होती. 23 मे रोजी संपलेल्या आठवडय़ात बेरोजगारी दर वाढून 14.7 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
पीरियोडिक लेबर फोर्स सर्वेच्या डाटानुसार 2017-18 मध्ये बेरोजगारी दर 45 वर्षांचा उच्चांकी स्तर 6.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. पण 2018-19 मध्ये हा आकडा कमी होत 5.8 टक्क्यांवर आला होता. 2020-21 मध्ये कोरोनामुळे स्थिती बिघडणे आणि बेरोजगारी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये जागतिक स्तरावर सरासरी बेरोजगारी दर 6.47 टक्के राहिला होता. 2019 मध्ये हाच आकडा 5.37 टक्के इतका होता. आयएलओनुसार मागील वर्षी बांगलादेशात बेरोजगारी दर 5.3 टक्के, श्रीलंकेत 4.48 टक्के, पाकिस्तानात 4.65 टक्के, नेपाळमध्ये 4.44 टक्के तर भूतानमध्ये 3.74 टक्के होता.