ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामन्यांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. मागील 28 दिवसांमध्ये 7.18 रुपयाने पेट्रोल तर 7.45 रुपयांनी डिझेल महाग झाले आहे. गेल्या काही दिवसांच्या पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आज ब्रेक लागला आहे. सध्या पेट्रोलने शंभरी पार केली आहे. काही ठिकणी तर पेट्रोल 106 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसले तरी पेट्रोल डिझेलचे आजचे दर मात्र स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल कंपन्यांनी आजचे दर स्थिर ठेवले असून सध्या तरी ग्राहकांना कोणताच दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे. 4 मे नंतर 49 दिवसांमध्ये 28 वेळा पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत.
मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये इतके झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोल 97.50 रुपये तर डिझेल 88.23 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 98.65 रुपये तर डिझेल 92.83 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 97.38 रुपये तर डिझेल 91.08 रुपये इतके वाढले आहे.
दरम्यान, काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, निवडणुकीच्या काळातच इंधनाचे दर कमी होतील, आता दिलासा मिळेल अशी आशा ठेवू नका.