ओटवणे / प्रतिनिधी-
मळगाव घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या माजगाव चिपटेवाडी मळगाव या ग़ामिण मार्ग क्र २६७ या रस्त्याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ दुरूस्ती करून मळगाव घाट रस्ता मार्गावरील वाहन चालकांची सध्या होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी या भागातून होत आहे.
गेल्या चार दिवसापासून मळगाव घाट रस्ता दुरूस्ती काम सुरू असून घाट रस्ता वाहतुकीस पुर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी जवळचा मार्ग म्हणून वाहनधारकानी मळगाव – चिपटेवाडी- माजगाव या रस्त्याला पसंती दर्शवली आहे पर्यायाने या रस्त्यावर सध्या वाहतूक वाढली आहे.
हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून केवळ ११०० मिटर रस्ताची देखभाल दुरुस्ती केल्यास हा रस्ता मळगाव घाट रस्त्याला सक्षम पर्याय ठरू शकतो. मात्र या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता रस्ता वाहतुकीस धोकादायक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.