प्रतिनिधी /बेंगळूर
खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. बेंगळूर येथील भाजप कार्यालयात झालेल्या समारंभात राज्य भाजप खासदार नतीनकुमार पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार महांतेश दोड्डगौडर, आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ तसेच पक्षाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासमवेत खानापूर तालुक्यातील काही ग्रा.पं. अध्यक्ष, ग्रा.प. माजी सदस्य व कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी बोलताना माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपण खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून कोणत्याही अटींशिवाय भाजपात प्रवेश केला आहे. या काळात तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार अरविंद पाटील भाजपात प्रवेश करणार अशी गेल्या वर्षभरापासून तालुक्यात चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी गेल्यावर्षी म्हणजे 17 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हुतात्मा दिनानंतर म.ए. समितीशी पूर्णपणे संपर्क तोडला होता. यामुळे ते म.ए.समिती सोडून भाजपमध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित होते. त्याची आज अधिकृतपणे कार्यवाही झाली.