पंढरपूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व पन्नास वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे सोलापूर येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे 95 वर्षे इतके वय होते.
देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पित्ताशयाच्या व्याधीवर त्यांची शस्त्रक्रिया देखील झाली होती. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
शेतकरी कामगार पक्ष व सांगोला विधानसभेच्या माध्यमातून गणपतराव देशमुख यांनी सलग पन्नास वर्षे आमदार म्हणून महाराष्ट्राची विधानसभा गाजवली. सन 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. 1962 साली पहिल्यांदा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. तर सन 2014 साली त्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली. 2012साली त्यांच्या संसदीय कार्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत त्यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूक लढवली. सन 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद वगळता सर्व निवडणुकांमध्ये गणपतराव देशमुख यांनी विजय प्राप्त केला होता. देशमुख यांचा 10 ऑगस्ट 1926 रोजी जन्म झाला होता.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा चालताबोलता इतिहास म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे आजपर्यंत पाहिले गेले. एक पक्ष एक मतदार संघ आणि एका विचाराने त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आमदार तसेच महाराष्ट्राचे रोजगार हमी योजनेचे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. अत्यंत साधी राहणी एसटी बसने प्रवास. आमदार निवास मध्येही स्वतः अन्न शिजवून भोजन करणे. अशा त्यांच्या साध्या कृतीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हे महाराष्ट्राला आजपर्यंत हवेहवेसे वाटत गेले आहे.
सांगोल्यात अंत्यसंस्कार…
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी निधन झाले यानंतर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सांगोला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.