प्रतिनिधी /म्हापसा
सांत आंद्रेचे मतदारसंघाचे पहिले आमदार तिओतीन परेरा यांचे 92 व्या वर्षी बुधवारी सकाळी 6 वा. म्हापशातील खासगी इस्पितळात निधन झाले. आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजता गोवा वेल्हा येथील सेंट अँड्रय़ू चर्चच्या दफनभूमीत अंतिमसंस्कार होणार आहेत.
गोवा ओपिनियन पोलमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले होते. 18 मार्च 1930 रोजी त्यांचा जन्म झाला होता. बस वाहतूक व्यवसायात त्यांनी लौकिक प्राप्त केला होता. पावलू ट्रेव्हल्सचे ते मूळ मालक होते.
1963 साली ते युनायटेड गोवन्सच्या तिकिटावर सांत आंद्रे मतदारसंघातून निवडून आले. 1972 मध्ये युनायटेड गोवन व 1980 मध्ये आरजी काँग्रेसमध्ये निवडून आले. गोवा विधिकार दिनाच्या कार्यक्रमात ते न चुकता हजेरी लावत होते. गोव्यात युगो सरकार आले असते तर आजचे चित्र वेगळे असते असे ते म्हणत. रोमी लिपीतील लोकणीचा प्रसार व्हावा यासाठी ते सातत्याने आग्रही होते.
फ्रान्सिस सिल्वेरा यांनी वाहिली श्रद्धांजली
सांत आंद्रेचे विद्यमान भाजप आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तिओतीन परेरा यांना श्रद्धाजली वाहतांना सांगितले की त्यांनी ज्या मतदासंघाचे नेतृत्व केले त्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळाली. 1963, 1967 आणि 1972 अशा सलग तीन निवडणुकांत ते सांत आंद्रेतून युगोच्या उमेदवारीवर विजयी झाले. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल होऊन पुन्हा 1980 मध्ये विजयी झाले.
गोवा जनमत कौलाच्यावेळी त्यांनी अग्रेसर भूमिका पार पाडली. त्यांच्या कार्यासाठी आणि एक लोकनेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांचे वक्तृत्व प्रभावी असल्याने अनेक सभांमध्ये त्यांनी लोकांची मने जिंकली होती. त्यांच्या जाण्याने सांत आंद्रे मतदारसंघाचे तसेच गोवा राज्याचे मोठे नुकसान झाले, असेही सिल्वेरा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
तिओतीन यांचे योगदान गोव्यासाठी मोलाचे- ऍड. दयानंद नार्वेकर
तिओतीन परेरा हे आपले वैयक्तिक मित्र आणि शेजारी. आपण प्रथम 1977 साली आमदार झालो त्या आधी ते आमदार होते. त्यांचे योगदान गोव्यासाठी खूप आहे. गोवा महाराष्ट्रात विलीन होऊ नये म्हणून त्यांनी खूप काम केले. गोवा स्वतंत्र ठेवण्यासाठी ते सदैव कार्यरत राहिले. त्यानंतर गोव्याला घटकराज्य प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपणही सहभागी आहे असे माजी मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर म्हणाले.
स्व. भाऊंचे चाहते होते – नारायण राटवड
माजी शिक्षक तथा माजी नगरसेवक नारायण राटवड म्हणाले की, तिओतीन परेरा हे स्व. भाऊंचे चाहते होते. आमदार म्हणून त्यांची मगोशी बांधिलकी होती. त्यांचे देशप्रेम मोठे होते. म्हापशात राष्ट्रीय कार्यक्रम झालेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत होते.