समर्थक, कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीतील भूमिका केली स्पष्ट
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण मतदारसंघात भाजपाच्या चिन्हावर दोन वेळा विजय मिळविलेले माजी आमदार विजय पै खोत यांनी आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले असून 12 रोजी संध्याकाळी आपल्या शेळेर येथील निवासस्थानी बोलाविलेल्या समर्थक व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी येत्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली.
2017 च्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी पै खोत यांना मिळालेली असताना माजी मंत्री रमेश तवडकर यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार या नात्याने निवडणूक लढविली होती. त्यात दोघाचे भांडण, तिसऱयाचा लाभ या उक्तीनुसार पै खोत यांचा पराभव होऊन काँगेसचे इजिदोर फर्नांडिस निवडून आले होते. 2022 ची निवडणूक आपण कोणत्याच पक्षाची साथ न घेता अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार असे घोषित करतानाच पै खोत यांनी या मतदारसंघातील आपल्या जुन्या समर्थकांच्या सहकार्याने संपूर्ण मतदारसंघात घरोघरी भेटी देऊन आपला संदेश पोहोचविण्याचे काम केले आहे.
त्याचा अंदाज घेण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी 12 रोजी संध्याकाळी त्यांनी बोलाविलेल्या वरील बैठकीला या मतदारसंघातील काणकोण पालिकेचे काही माजी नगरसेवक, माजी सरपंच, पंच, भाजपमधील त्यांचे समर्थक मिळून साधारणपणे 200 पेक्षा अधिक समर्थक उपस्थित होते. पै खोत यांनी निवडणुकीत उतरण्याची पूर्ण तयारी केल्यामुळे 2022 ची काणकोण मतदारसंघातील निवडणूक बरीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.