ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुरुवातीला एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे सिंह यांनी देशाची प्रदीर्घ सेवा केली. बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी ते कायम स्मरणात राहतील. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारमध्ये त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्रालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.
एनडीए सरकारमध्ये 1996 ते 2004 या कालावधीत महत्वाची पदे सांभाळल्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सिंह यांना तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. त्याच वर्षी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते कोमात गेले होते.