ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची दिल्लीतील राहत्या घरी हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
किट्टी कुमारमंगलम असे हत्या झालेल्या दिवंगत माजी मंत्र्यांच्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी एका संशयित इस्त्रीवाल्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किट्टी कुमारमंगलम या दिल्लीतील वसंत विहार परिसरामध्ये राहत होत्या. त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होत्या. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक इस्त्रीवाला त्यांच्या घरी आला. त्यानंतर आणखी दोन व्यक्ती त्यांच्या घरात आल्या. त्यांनी किट्टी यांचे हातपाय बांधून, तोंडावर उशी दाबून त्यांची हत्या केली. रात्री 11 वाजता पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.