नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी केंद्रीय मंत्री पी. रंगराजन कुमारमंगलम् यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम् यांची हत्या केल्याची घटना बुधवारी उघड झाली. 67 वर्षीय किट्टी कुमारमंगलम् या राहत्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आल्या. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील वसंत विहार भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरोडय़ाच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा निष्कर्ष तपास अधिकाऱयांनी काढला असून याप्रकरणी मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. 24 वर्षीय राजू नामक युवकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
राजू हा वॉशरमन म्हणून काम करणारा युवक मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कुमारमंगलम् यांच्या घरात आला होता. त्यानंतर अन्य दोघेजण त्यांच्या घरात शिरले. त्यांनी उशीच्या सहाय्याने कुमारमंगलम् यांना कोंडून मारल्यानंतर घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.