ऑनलाईन टीम
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं कोरोनाने आज, निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून ते कार्यरत होते.
मंत्री चौहान यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्यामुळे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. जुलैमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
१९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले. गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. १९८१ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.