ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा इशारा दिल्ली एम्सचे निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्वतः दिला आहे.
त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी स्वतः गौतम गंभीर याने ट्विट करत दिली आहे.
गौतम गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, माझ्या घरात कोरोनाचा पेशंट आढळल्यानंतर मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. तसेच मी स्वतःची कोरोना टेस्ट केली असून रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहे. तसेच सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि या महमारीकडे न घाबरता पण गंभीरतेने पहा आणि स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन देखील त्याने यावेळी नागरिकांना केले आहे.