वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले. एआयआयएमएस येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त हॉस्पिटलच्या सूत्राने दिले.
47 वर्षीय मोहपात्रा यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे या हॉस्पिटलचे सुपरिन्टेडेन्ट डॉ. एस.एन. मोहंती यांनी सांगितले. प्रशांत यांचे वडील रघुनाथ मोहपात्रा यांचेही कोरोनामुळे 9 मे रोजी निधन झाले. प्रशांत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या खास पथकाने त्यांच्यावर लक्ष ठेवले होते. त्यांचे भाऊ जसोबंत हेदेखील याच हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.
प्रशांत हे मुन्ना या नावाने लोकप्रिय होते. ते सलामीला खेळत असत. 1990 मध्ये त्यांनी बिहारविरुद्ध रणजी पदार्पण केले होते. याशिवाय दुलीप ट्रॉफी व देवधर ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी 45 प्रथमश्रेणी सामन्यात 30.08 च्या सरासरीने 2196 धावा जमविल्या. त्यात पाच शतके व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर बीसीसीआयने देशी क्रिकेटमध्ये त्यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.