वृत्तसंस्था/ मुंबई
रेल्वे रणजी संघातील माजी क्रिकेटपटू शिराज धरसी यांचे गुरुवारी वयाच्या 73 व्या वषी लंडनमध्ये निधन झाले. त्यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 49 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत.
1965-66 ते 1973-74 या कालावधीत दिवंगत धरसी यांनी 49 प्रथमश्रेणी सामन्यात 2288 धावा जमविल्या असून त्यामध्ये 4 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईमध्ये त्यांनी अनेक वेळा स्थानिक क्रिकेटमध्ये आपला सहभाग दर्शविला होता. काही सामन्यांमध्ये त्यांनी सीसीआय आणि जॉली क्रिकेटर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या एका विदेशी दौऱयामध्ये त्यांना राखीव खेळाडू म्हणून संधी दिली होती.