नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
पप्पू यादव यांच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावाजवळ डझनभर अॅम्ब्युलन्स पकडल्या होत्या. खासदार निधीतून या सर्व अॅम्ब्युलन्स खरेदी केल्या होत्या. पप्पू यादव यांच्यावर सरकारी संपत्तीचं नुकसान करणं आणि कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू यादव यांनी स्वत: ट्विट करुन आपल्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईची माहिती देत म्हटले आहे की, “मला अटक करुन पाटण्यातील गांधी मैदान पोलीस स्टेशनला नेलं आहे.” दरम्यान, पप्पू यादव यांनी यासंबंधी दुसरे एक ट्विट केलं आहे. “कोरोना काळात जर जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करणं गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री साहेब मला फाशी द्या किंवा जेलमध्ये पाठवा. झुकणार नाही, थांबणार नाही. लोकांना वाचवणार, बेईमानांचा पर्दाफाश करणार.”