प्रतिनिधी / बेंगळूर
देशातील नामवंत शिक्षणतज्ञ आणि कोलार जिल्हय़ातील केजीएफच्या माजी खासदार डॉ. पी. सेल्विदास यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर बेंगळूरमधील खासगी इस्पितळात उपचार सुरु होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. समाज सुधारक आणि शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची देशभरात ख्याती होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदे भूषविली होती. 1988 ते 1991 या कालावधीत डॉ. पी. सेल्विदास या म्हैसूर विद्यापीठाच्या कुलगुरु होत्या. या विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरु होत्या. 1991 ते 1997 या कालावधीत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्यपदही सांभाळले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधीत्वही केले होते. 1997 ते 2003 या कालावधीत डॉ. सेल्विदास यांनी राज्यसभेचे सदस्यपदही भूषविले होते. त्यांनी म्हैसूर विद्यापीठात महिला अध्ययन केंद्र सुरु केले होते. त्यांची शिक्षण क्षेत्रातील आवड पाहून सरकारने त्यांना उच्च शिक्षण खात्याच्या संचालकपदी नेमले. होते. त्यांनी हे पद 10 वर्षे सांभाळले होते.