ऑनलाईन टीम / नागपूर :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरच्या शिवाजीनगर परिसरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापा टाकला. ईडीची दोन पथके देशमुख यांच्या शिवाजीनगरमधील घराची झाडाझडती घेत आहेत. यापूर्वी ईडीने 25 मे रोजीही देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंगअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासाचा भाग म्हणून ईडीने आज सकाळी 6 वाजता देशमुखांच्या घरी दुसऱ्यांदा छापा टाकला असून, ही प्रकिया अद्याप सुरू आहे. 16 जूनला ईडीच्या तीन पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते.