खोका काढून घेण्याची दिलेली मुदत संपल्याने केली कारवाई
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील शिवनदी पुलाशेजारील माजी नगरसेवक रमेश खळे यांचा खोका अखेर नगर परिषदेने शुक्रवारी सील केला. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान त्यांना स्वत: खोका काढून घेण्याची दिलेली मुदत संपल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खळे यांनी खेड जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने नगर परिषदेला 21 नोव्हेंबर रोजी म्हणणे मांडण्यासाठी नोटीस दिली आहे.
शहरात दिवसेंदिवस भररस्त्यात वाढणाऱया अतिक्रमणाविरोधात नगर परिषदेने धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचा शुभारंभ खळे यांच्या शिवनदी पुलालगतच्या खोक्यापासून करण्यात आला. मात्र या कारवाईला विरोध करण्यासाठी खळे यांनी खोक्यावर चढून, तर त्यांच्या मुलाने लगतच्या इमारतीवर जाऊन आत्महत्त्येचा इशारा देत विरोध करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी खळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. खळे हे माजी नगरसेवक असल्याने त्यांच्या खोक्यावर कारवाई करताना नगर परिषदेला फेस आला होता. अखेर त्यांना स्वत: खोका काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली. यावरूनही नगर परिषदेविरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या.
असे असताना खळे यांना दिलेली मुदत संपल्याने शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी खळे यांचा हा खोका सील केला आहे. त्यावर नोटीस लावण्यात आली असून खोका नगर परिषदेने सील केला असून ते काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे नगर परिषदेने आपली कारवाई सुरू ठेवली असतानाच दुसरीकडे खळे यांनी खेड जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाने नगर परिषदेला नोटीस देऊन 21 रोजी आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे हा वाद आता चांगलाच रंगणार आहे.
पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमण
नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम कायम ठेवली आहे. मात्र पथक कारवाई करून पुढे जाताच भोगाळेसह अन्य भागात पुन्हा व्यावसायिक रस्त्यावर बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पथकाला परत परत सर्व ठिकाणी येऊन त्यांना उठवावे लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठीच लवकरच शासकीय जागेपर्यत पत्रे मारले जाणार आहेत.