‘लँडमाफिया’ विक्रांत शेट्टीचे : सरकारी अधिकाऱयांकडे ‘सेटिंग’
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात शासकीय अधिकाऱयांचाही हात असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या प्रकरणात पुराभिलेख खात्याचे माजी संचालक, बार्देशचे तत्कालीन मामलेदार, आणि उपनिबंधक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. पुराभिलेख संचालक, बार्देश तालुका मामलेदार तसेच उपनिबंधक त्यावेळी कोण होते, त्यांची पोलीस चौकशी करत आहेत.
या प्रकरणात पहिल्यांदा अटक झालेल्या लँडमाफिया विक्रांत शेट्टी याने बडय़ा लँड शार्कांचे पितळ उघडे पाडण्यास सुरुवात केली आहे. एसआयटीने त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता कोणकोणत्या अधिकाऱयांनी कोणकोणती कामे करून भूखंडांची बनावट सेलडीड बनवली त्याची माहिती त्याने उघड केली आहे.
दुर्भाट येथील चारजणांवर गुन्हा नोंद
एसआयटीने दुर्भाट फोंडा येथील लुईझा फर्नांडिस, आयतानो फर्नांडिस, मीना रमाकांत नाईक, आणि इतर काहीजणांविरोधात भादंसंच्या 465, 466, 467, 468, 471, 419, 420 तसेच 120 (बी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. कारस्थान, फसवणूक, फेरफार अशा गुह्यांचा यात समावेश आहे. संशयितांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
शेट्टी या एकटय़ानेच केले सात घोटाळे
राज्यात एकून 70 भूखंडांचा घोटाळय़ाची प्रकरणे असून शेट्टी याने एकटय़ानेच 7 ठिकाणचे भूखंड बळकावून परस्पर विकले असल्याचे उघड झाले आहे.
विविध प्रकारे हडप केल्या जमिनी आणि विकल्या
एका मालमत्तेची सेलडीड करताना मृत महिलेला पॉवर ऑफ ऍटर्नी करण्यात आले आहे. ती एका पब्लिक प्रॉसीक्युटरची आजी आहे. दुसऱया प्रकरणात आढळून आलेल्या बोगस प्रमाणपत्रानुसार मालमत्ता विकणाऱयाने ती आपल्या जन्माच्या अगोदरच विकून टाकली आहे, असा अर्थ होतो. आणखी एका घोटाळय़ात केवळ एका महिन्यातच म्युटेशन झाल्याचे आढळून आले आहे. अन्य एका प्रकारात चक्क 23 जण मालमत्तेचे हक्कदार असताना एकाच हक्कदाराने मालमत्ता विकल्याचे आढळून आले आहे.