वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचे माजी फुटबॉलपटू चिन्मय चटर्जी यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक चिरंजीव आणि एक कन्या असा परिवार आहे.
1970 ते 1980 या दशकामध्ये चटर्जी यांनी मोहन बागान आणि इस्ट बंगाल या दोन बलाढय़ फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इस्ट बंगाल संघाला तीनवेळा कोलकाता फुटबॉल लीग स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले होते. फुटबॉल क्षेत्रातील निवृत्तीनंतर चटर्जी यांची इस्ट बंगाल संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. चटर्जी यांनी चारवेळा संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधीत्व केले होते आणि बंगालने तीनवेळा संतोष करंडक पटकाविला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तसेच बंगाल फुटबॉल संघटनेतर्फे चटर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.