वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचे माजी फुटबॉलपटू तसेच प्रख्यात मोहन बागान फुटबॉल क्लबचे माजी हुकमी विंगर प्रणब गांगुली यांचे शुक्रवारी वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
गेल्या काही दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शुक्रवारी त्यांचे निधन झाले. 1969 साली आयएफए शिल्ड फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया मोहन बागान संघाकडून खेळताना गांगुली यांनी महत्त्वाचे दोन गोल नोंदविले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहन बागानने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी इस्ट बंगालचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. गांगुली यांच्या उपस्थितीत मोहन बागान क्लबने कोलकाता लीग, आयएफए ढाल स्पर्धा, डय़ुरँड चषक आणि रोव्हर्स चषक फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत. 2020 साली मोहन बागान फुटबॉल क्लबने प्रणब गांगुली यांचा आजीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान केला होता.