वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी फुटबॉलपटू व ध्यान चंद पुरस्कार विजेते सईद शाहिद हकीम यांना कोव्हिड 19 ची लागण झाली असून हैदराबादमधील क्वारंटाईन केंद्रात ते सध्या उपचार घेत आहेत.
81 वर्षीय हकीम हे 1960 मध्ये झालेल्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघातील सदस्य होते. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला त्यांनीही दुजोरा दिला आहे. ‘सहा दिवसांपूर्वीच मला कोरोनाची लागण झाली असून सध्या हैदराबादमधील हॉटेलमध्ये उपचार घेत आहे. राज्य सरकारने या हॉटेलमध्येच क्वारन्टाईन सेंटर सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या प्रकृतीत सुधारणा असून लवकरच माझी चाचणी निगेटिव्ह येईल आणि मी लवकर घरी परतेन, अशी मला आशा वाटते,’ असे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाऊन आल्यानंतर ते आजारी पडले होते. नंतर त्यांची कोरोना चाचणी घेतली गेली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.
हकीम यांना 2017 मध्ये ध्यान चंद जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्याआधी 2011 मध्ये शब्बीर अली यांना हा बहुमान मिळाला होता. फुटबॉलची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी 1989 पर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत रेफरीचे काम पाहिले. सुप्रसिद्ध प्रशिक्षक सईद अब्दुल रहीम हे त्यांचे वडील असून नंतर हकीम यांनीही प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली आहे. साई केंद्रामध्ये त्यांनी मुख्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.