पूर्वांचलमध्ये वाढविणार सायकलचा वेग
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडून सायकलवर स्वार होण्याचे सत्र सुरूच आहे. स्वामीप्रसाद मौर्य आणि अनेक आमदारांनंतर आता योगी सरकारमधील माजी मंत्री दारासिंह चौहान यांनी कमळाचे फुल सोडून सायकलवर बसण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
दारासिंह यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देत समाजवादी पक्षात सामील होण्याचे संकेत दिले होते. आता अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत ते समाजवादी पक्षात सामील झाले आहेत. दारासिंह यांच्यावर राज्याच्या पूर्वांचल भागात सायकलचा वेग वाढविण्याची म्हणजेच समाजवादी पक्षाला मजबूत करण्याची जबाबदारी असणार आहे.
सपप्रवेश करताच दारासिंह यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 2017 मध्ये भाजपने सबका साथ, सबका विकास नारा दिला होता. परंतु साथ सर्वांची घेतली गेली, पण विकास काही निवडक लोकांचाच झाला. उर्वरित लोकांना वाऱयावर सोडण्यात आले. लोकांना गुलाम करण्याचा कट रचला जात असताना देश आत्मनिभर कसा होणार असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले.
गरीबांना काहीसे अन्न, धान्य आणि आमिष दाखवून गुलाम करण्याचा कट रचला जात असला तरीही आता गरीब आणि मागास वर्गीय लोक आता या थापांना बळी पडणार नाहीत. मागील निवडणुकीत मागास, दलित, बेरोजगार युवकांनी भाजपला पूर्ण समर्थन दिले होते. शेतकऱयांनी स्वतःच्या पिकासाठी समर्थन दिले होते. परंतु थंडीत हाच शेतकरी स्वतःच्या पिकाला प्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतात बसला असल्याचा आरोप त्यांनी केला.