कोलकाता :
भारताचे माजी महान फुटबॉलपटू चुनी गोस्वामी यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी बसंती व मुलगा सुदिप्तो असा परिवार आहे.
फुटबॉलपटू असलेल्या चुनी गोस्वामी यांनी बंगालतर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही भाग घेतला होता. 1962 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ते भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार होते. फुटबॉलपटू या नात्याने त्यांनी भारतातर्फे 1956 ते 1964 या कालावधीत 50 सामन्यांत प्रतिनिधित्व केले तर क्रिकेटपटू म्हणून 1962 ते 1973 या कालावधीत त्यांनी बंगालचे 46 प्रथमश्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व केले होते.