बेंगळूर हिंसाचार प्रकरण : उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी आणि के. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणी माजी महापौर संपतराज यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या एकसदस्यिय खंडपीठाने संपतराज यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
माजी महापौर संपतराज यांचे वकील सी. व्ही. नागेश यांनी युक्तीवाद करताना अलिकडेच संपतराज यांच्याविरोधात दोन वेळा आरोपपत्र दाखल झाले आहेत. मात्र, सबळ पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. आरोपपत्रात संपतराज यांचे नाव उशिरा समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय सुडापोटी खटला दाखल करण्यात आल्याचा संशय बळावतो, असे सांगितले. वाद-युक्तीवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने संपत यांना अनेक शर्तींवर जामीन मंजूर केला.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बेंगळूरच्या पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या भाच्याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर के. जे. हळ्ळी व डी. जे. हळ्ळी येथे जमावाने हिंसक होत पोलीस स्थानक, अनेक घरे, असंख्य वाहनांची तोडफोड केली. अनेक वाहने पेटवून दिली. या घटनेप्रकरणी संपतराज यांच्यासह 140 हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये माजी महापौर, माजी नगरसेवकांचाही समावेश होता.