बेंगळूरमधील हिंसाचार प्रकरणी सीसीबी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी आणि के. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी महापौर संपत राज यांना अखेर अटक करण्यात आली आहे. बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बेंगळूरमधील हिंसाचार प्रकरणात संपत राज यांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून उघड होताच सीसीबी पोलिसांनी त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे 14 सप्टेंबर रोजी संपत राज बेंगळूरमधील बाप्टिस्ट इस्पितळात दाखल झाले होते. त्यांनी आपल्यावर सध्या उपचार सुरू असून चौकशीसाठी हजर राहणे शक्य नाही, असे सांगितले होते. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी डिस्चार्ज मिळविला. तीन दिवसांनी पुन्हा इस्पितळात दाखल होऊन डिस्चार्ज मिळविला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी ते पुन्हा इस्पितळात दाखल झाले होते. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी ते इस्पितळातून फरार झाले होते. त्यांच्या अटकेसाठी सीसीबी पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबविली होती. अखेर रविवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सीसीबीचे पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी दिली.
माजी महापौर संपत राज आणि माजी नगरसेवक झाकीर यांना आश्रय दिलेल्या रियाजुद्दिन याला पोलिसांनी अटक करून चौकशी केली. यावेळी त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे संपत राज यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख सुत्रधार कोण?, याचा उलगडा होईल. बेंगळूरच्या बेन्सन टाऊन येथील मित्राच्या निवासस्थानी रात्री उशिरा संपत राज आले. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
हिंसाचार प्रकरणी फरार झालेल्या माजी महापौर संपत राज यांना मंगळवारी अटक करून बेंगळूरच्या 67 व्या सीसीएच न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना दोन दिवसांची सीसीबी पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्रत्येकाने कायद्याचा आदर केलाच पाहिजे
संपत राज असो किंवा इतर कोणीही. प्रत्येकाने कायद्याचा आदर केलाच पाहिजे. आपण सुरुवातीपासून आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्यासोबत आहे. मात्र, सरकार कायद्याचा दुरुपयोग करीत असल्याचे आपण पाहिले आहे. इतरांच्या वैयक्तिक वक्तव्याविषयी आपण प्रतिक्रिया देणार नाही.
– डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष