बेंगळूर/प्रतिनिधी
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा जाळण्यापासून रोखल्याने भाजप नेत्याने पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावली आहे. एका पोलीस हवालदाराने कर्नाटकचे भाजपा नेते आणि माजी आमदार ए. पापरेड्डी यांना निषेध रॅलीदरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पुतळ्याचे दहन करण्यापासून रोखले होते. यामुळे संतापलेल्या माजी आमदारांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, पापरेड्डी यांनी रायचूर पश्चिम पोलीस ठाण्यात तैनात असलेला हवालदार राघवेंद्रला धक्काबुक्की करताना आणि कानशिलात मारताना दिसत आहे.
२६ ऑक्टोबर रोजी सिंदगी येथे जाहीर सभेत दलितांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी निषेधादरम्यान ही घटना घडली. वाद वाढू लागल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत पापरेड्डी आणि हवालदाराला भांडण्यापासून रोखले. नंतर पत्रकारांशी बोलताना पापरेड्डी म्हणाले, “साध्या वेशभूषेतील माणूस पोलीस हवालदार आहे हे मला माहीत नव्हते. मला वाटलं की तो भाजपचा कार्यकर्ता आहे. हवालदाराने पुतळा हिसकावून नाल्यात फेकल्यामुळे मी चिडलो,” असं त्यांनी सांगितलं. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलंय.