प्रतिनिधी /पणजी
माजी रणजी क्रिकेटपटू रॉबिन डिसोझा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाला बळकटी येणार असल्याचे सांगितले.
पणजीतील काँग्रेस भवनात हा प्रवेशाचा सोहळा थोडक्यात करण्यात आला. माजी फुटबॉलपटू आल्बितो त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाकडे खेळाडू वर्ग आकर्षित होत असून त्यांनी जसे मैदान गाजवून अनेकदा विजय खेचून आणला तसा विजय विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याचे कामत व चोडणकर यांनी नमूद पेले.
श्री. डिसोझा यांनी सांगितले की, आपल्यास उमेदवारीची लालसा नाही. आपण काँग्रेस पक्षासाठी काम करणार असून सध्याचा भाजप पक्ष जनतेसाठी त्रासदायक ठरला आहे. त्यास हटवणे काळाची गरज असून त्यासाठीच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे डिसोझा म्हणाले. पक्षाचे अनेक पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांनी डिसोझांचे चांगले स्वागत करुन त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसचा फायदा होणार असल्याचे सांगितले.