सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे कधी असे घडले नाही अशी परिस्थिती सह्याद्री पट्ट्यातील भागात घडली आहे. धवडकी, माडखोल, गाळेल आदी भागाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली. येथील अनेक कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा कुटुंबीयांना ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू देत त्यांनी मदतीचा हात दिला आहे. भोसले म्हणाले या तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात घरातील सामान पाण्यात खराब तर झाले तसेच वाहून गेले आहे त्यामुळे नुकसानभरपाई त्वरित मिळावी आणि नुकसानीच्या पट्टीतील नुकसानी मिळावी म्हणून आपण अर्थमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधणार आहे असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच संजय शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य राजू देसाई, सिद्धेश शिरसाट, पोलीस पाटील उदय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष जोईल, शहराध्यक्ष देवा टेमकर, निहाल शेख, राजगुरू, ओमकार पानोळकर, आबा धडम, अरुण महाडगुत आदी उपस्थित होते. भागातील पोलीस पाटील उदय राऊत यांच्या गणेशशाळेतील जवळपास 40 मूर्ती खराब झाल्या तर ओंकार पानोळकर यांच्या साठ मुर्त्या पूर्णपणे पाण्यात विरघळून गेल्या त्यामुळे ऐन हंगामात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत करण्यात आली.