ऑनलाईन टीम / ढाका :
बांग्लादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या लष्कराच्या माजी कॅप्टनला 45 वर्षानंतर रविवारी मध्यरात्री तेथील प्रमाणित वेळेनुसार 12 वाजून 01 मिनिटांनी फासावर चढवण्यात आले. कायदा मंत्री अनिसुल हक यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अब्दुल माजेद असे फासावर लटकवलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. फाशीनंतर 12 वाजून 15 मिनिटांनी माजेद याला तेथील स्थानिक डॉक्टरांनी मृत घोषित केले. माजेदचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठी सोपवला जाणार आहे.
बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांची हत्या करण्यात आलेल्या 1975 सालच्या बंडातील सहभागाबद्दल माजेदला या हत्याकांडानंतर 45 वर्षांनी फाशी देण्यात आली. या हत्याकांडात सहभागी असलेल्या लष्कराच्या 12 माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापैकी पाच जणांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली होती. तर एकचा मृत्यू झाला होता.
अब्दुल माजेद हा 23 वर्ष कोलकात्यात लपून राहिला होता. मंगळवारी त्याला ढाक्यात अटक करण्यात आली. गुरुवारी राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी माजेदची दया याचिका फेटाळून लावल्यामुळे त्याची फाशी निश्चित झाली होती. रविवारी मध्यरात्री 12 वाजून 01 मिनिटांनी त्याला फाशी देण्यात आली.