वेलिंग्टन
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडने बांगलादेशचा 100 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात इंग्लंडतर्फे सोफिया डंक्लेने फलंदाजी करताना 67 धावा झळकविल्या तर इक्लेस्टोनने 15 धावांत 3 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 6 बाद 234 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 48 षटकांत 134 धावांत संपुष्टात आला. या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी इंग्लंडला या सामन्यात विजयाची नितांत गरज होती.
इंग्लंडच्या डावामध्ये सोफिया डंक्लेने 67 तर स्किव्हेरने 40 धावा जमविल्या. ऍमी जोन्सने 31 तर ब्रंटने नाबाद 24 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात पहिल्या आठ षटकांत त्यांनी वेट आणि नाईट हे दोन फलंदाज 26 धावांत गमविले होते. वेटने 6 तर नाईटने 9 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे सलमा खातूनने 46 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा डाव 48 षटकांत 134 धावांत आटोपला. बांगलादेशतर्फे लता मोंडलने 30 धावा तर शमीमा सुल्ताना आणि शर्मीन अख्तर यांनी प्रत्येकी 23 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 15 धावांत 3 गडी बाद केले. चार्लोटी डीनने 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 50 षटकांत 6 बाद 234 (डंक्ले 67, स्किव्हेर 40, जोन्स 31, ब्रंट नाबाद 24, सलमा खातून 2-46), बांगलादेश 48 षटकांत सर्वबाद 134 (लता मोंडल 30, सुल्ताना 23, अख्तर 23, इक्लेस्टोन 3-15, डीन 3 बळी).